कोथरूड - कोचीतून पुण्यात आलेल्या रुग्णाला १०८ रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध झाली नाही. त्यामुळे त्याला बसमधून जाण्याची वेळ आली होती. परंतु, तो संशयित रुग्ण असल्याचे ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने व एका हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याने तत्परतेने सांगितले. अखेर दुसऱ्या रुग्णवाहिकेतून त्याला ससूनमध्ये दाखल केले.
कोचीतून पुण्यात एक जण विमानाने आला होता. त्याला ताप आला नसल्याने घरी पाठविले. परंतु, घरी आल्यानंतर त्याला ताप आला. नातेवाइकांनी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सिगारेटची सवय असल्याचे आणि तापाने अंग थरथरतेय, श्वास घ्यायला त्रास होतोय, असे त्याने डॉक्टरांना सांगितले. डॉक्टरांनी ससूनमध्ये नेण्यासाठी १०८ नंबरला फोन करून रुग्णवाहिका बोलवा, असे सांगितले. त्याप्रमाणे नातेवाइकांनी फोन केला. परंतु, रुग्णवाहिका येईना. रुग्णाची अस्वस्थता अधिकच वाढली. ‘सकाळ’च्या प्रतिनिधीला माहिती कळताच तो घटनास्थळी गेला. इकडे रुग्णवाहिका येत नाही. त्यामुळे रुग्ण बसमधून जाण्यासाठी निघाला. बसमध्ये फक्त तीन जण होते. त्यांना माहीत नव्हते की, बसमध्ये बसणारा प्रवासी संशयित रुग्ण आहे. जर ही व्यक्ती पॉझिटिव्ह असेल, तर अनर्थ होईल, याची त्यांना कल्पना नव्हती. यंत्रणेतील त्रुटीमुळे व काहींच्या बेजबाबदारीमुळे गंभीर अनर्थ ओढवण्याची शक्यता होती. यातील गांभीर्य लक्षात घेऊन ‘सकाळ’ प्रतिनिधी व हॉस्पिटलच्या सेवकांनी आवाज देत बसला जाण्यास सांगितले.
तत्पूर्वी, ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने १०८ नंबरला फोन करून रुग्णवाहिका हवी असल्याचे सांगून तातडीने मदत करण्याची विनंती केली. परंतु, ऑपरेटरने आवाज नीट ऐकू येत नाही, अशी तक्रार केली. त्यावर ‘सकाळ’चा प्रतिनिधी असल्याचे सांगताच ऑपरेटरने, ‘मी तुम्हाला माझ्या नंबरवरून फोन करते,’ असे सांगत फोन केला. ऑपरेटरने पेशंटचे नाव, हिस्टरी इत्यादी विचारले. खासगी रुग्णालय जवळ असेल, तर त्याला त्यांच्या रुग्णवाहिकेतून पाठवा, असेही सुचविले. तीनदा ऑपरेटरशी संवाद साधण्यात वीस मिनिटे वाया गेली होती. ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने गोपाल जांभे या रुग्णवाहिका चालकास विनंती केली. त्या रुग्णवाहिकेतून ससूनला हलविले. रुग्णाच्या नातेवाइकांनी ‘सकाळ’च्या प्रतिनिधीकडे कृतज्ञता व्यक्त केली.
‘कोरोना’सारख्या संसर्गजन्य आजारांसाठी वेगळ्या रुग्णवाहिका ठेवल्या आहेत. या रुग्णवाहिकेतून अन्य रुग्णांना नेल्यास त्यांना संसर्ग होऊ नये, म्हणून ही खबरदारी घेतल्याचे समजते. दरम्यान, या रुग्णाला रुग्णवाहिकेत बसवून दिल्यानंतर वीस मिनिटांनी पुन्हा ‘सकाळ’च्या प्रतिनिधीला १०८ नंबरच्या प्रतिनिधीकडून फोन आला की, सदाशिव पेठेतून रुग्णवाहिका येत आहे. त्यावर ‘सकाळ’ प्रतिनिधीने त्यांना रुग्णास ससूनकडे रुग्णवाहिकेतून रवाना केल्याचे कळविले.कोचीतून पुण्यात येताच या व्यक्तीला विलगीकरण कक्षात ठेवले असते, तर ही वेळ आली नसती. पुण्यात विमानाने येणाऱ्या व्यक्तींची व्यवस्थित तपासणी होत नाही, हे यातून दिसते. या त्रुटी समाजासाठी घातक ठरतील; म्हणून सर्व यंत्रणांनी जबाबदारीने वागणे गरजेचे आहे.
- दिलीप कानडे, समाजसेवक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.